न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचा सातवा वर्धापन दिन अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त पाणपोई सुरू करण्यात आली. तसेच चिंचवड येथील अंध व अपंगांच्या “नचिकेत बालग्राम” या संस्थेस धान्य देण्यात आले.मराठवाडा जनविकास संघाच्या मुख्य कार्यालयात संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डी.पी. रोड पिंपळे गुरव येथे सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी शिव कीर्तनकार डॉ. गजानन व्हावळ, संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष भैरुजी मंडले, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, शंकर तांबे, नामदेव पवार, अनिल पाटील, अतुल होळकर, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गजानन वाव्हळ यांनी सांगितले, की मी गेले बरेच वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो, पण मराठवाडा जनविकास संघासारखी संस्था मिळणे फारच कठीण आहे. संघामार्फत समाजातील प्रत्येक घटकासाठी कोणताही स्वार्थ न धरता सामाजिक बांधीलकीचे भान ठेऊन संस्था वाटचाल करीत आहे.
शारदा मुंडे यानी मराठवाडा जनविकास संघ ही संस्था ही गोरगरिबांसाठी झटणारी संस्था असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात अरुण पवार म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघटनेच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करीत आलो आहोत. यापुढेही संघटनेच्या माध्यमातून देशासाठी भरघोस योगदान द्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर वामन भरगंडे यांनी आभार मानले










