न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल) :- महावितरणातील भोंगळ कारभारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, ग्राहकांना व पर्यायाने महावितरण वीज कंपनीला आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात याकरीता विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी आज मंगळवार (दि. ९ एप्रिल) रोजी महावितरण प्रभारी, प्रादेशिक संचालक सचिन तालेवार यांची पुण्यातील प्रकाशभवन येथे भेट घेतली. याप्रसंगी गणेशखिंड अधिक्षक अभियंता पंकज तगडपल्लीवार, प्रदीप बेळगावकर, सुरज भराटे, भाऊसाहेब तांबे आदी उपस्थित होते.
सौंदणकर यांनी त्यांना मीटर संदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या काही दिवसांपासून मीटर्सची कमतरता संपूर्ण पुणे जिल्ह्यात जाणवत आहे. त्यामुळे मीटर्स त्वरित उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सौंदणकर यांनी या निवेदनात केली आहे.
प्रभारी तालेवार यांनी १ फेज मीटर उपलब्ध आहेत. थ्री फेज मीटर्स व ४० /२०० सिटी ऑपरेटेड मीटर्स साधारण एका आठवड्यामध्ये उपलब्ध होतील, असे आश्वासन यावेळी दिले.










