- दिल्लीतील राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून अभ्यासक्रमासाठी मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२३) :- महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात राष्ट्रीय परीक्षा बोर्डाच्या (डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड) वैद्यकीय शाखेतील एम.डी. आणि एम.एस. यांना समकक्ष डीएनबी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत तीन विषयाचे अभ्यासक्रम शिकविता येणार आहे.
बालरोग, भूलशास्त्र आणि स्त्रीरोग या विषयांतील अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ४ याप्रमाणे एकूण १२ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश देता येईल, तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असल्याने एकूण प्रत्येक वर्षनिहाय १२ याप्रमाणे एकूण ३६ विद्यार्थ्यांना येथून डीएनबी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी दिल्ली येथील राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आवश्यक मंजुरी मिळाली आहे.
महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध वैद्यकीय अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक मान्यता मिळालेली आहे. त्यापाठोपाठ आता थेरगाव रुग्णालयातही नवीन तीन अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे.












