- पुन्हा हॉटेल सुरु झाले तर, गुन्हा दाखल केला जाईल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील रुफटॉप हॉटेलबाबत आक्रमक भूमिका घेत या हॉटेलवर सरसकट कारवाई करण्याचे धोरण हाती घेतले आहे. या कारवाईमध्ये अनधिकृत असलेली सर्व रूफटॉप हॉटेलमध्ये दारू, जेवण, हुका अशा सर्व गोष्टी मिळतात. अशा हॉटेलमध्ये मोठमोठे किचन आहेत. मात्र, एकाही हॉटेल्स मालकाने रुफटॉप हॉटेलसाठी परवानगी घेतलेली नाही. कोणत्याही हॉटेल मालकाकडे बांधकाम परवाना नाही. अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नाही, त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचा कर बुडत आहे. दुर्घटनेस कारणीभूत ठरणारे हे हटिल विनदिकतपणे सुरू आहेत. शहरात महापालिकेने सर्वेक्षण केले असून, त्यात ४९ रुफटॉप हॉटेल्स आढळली होती. त्यापैकी नऊ हॉटेलवर हातोडा घालण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली. थेरगाव, वाकड, पिंपळे सौदागर, विशालनगर, रहाटणी आदी भागातील रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली.
दरम्यान, यातील काही रुफटॉप हॉटेलमालकांनी महापालिकेकडून तसेच इतर विभागाकडून काही परवनग्या घेतल्या आहेत. तर अनेक हॉटेलने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. मात्र, संबंधित हॉटेलमालक व चालकांच्या मागणीनुसार महापालिकेने या हॉटेलचालकांना कागदपत्रे जमाकरून परवानगी घेण्याची संधी दिली होती. मात्र, हॉटेलचालकांकडे कोणतेही कागदपत्रे सादर न केल्याने शहरातील सर्व रुफटॉप हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, काही हॉटेलांनी गच्चीवर ग्राहकांना बसण्याची परवानगी घेतली आहे. परवानगीनुसारच त्यांची बैठक व्यवस्था व तेथील बांधकाम असणे आवश्यक आहे. अनेक हॉटेलचालकांनी गच्चीवर जास्त ग्राहकांना बसता यावे, यासाठी परवानगीव्यतिरिक्त बैठक व्यवस्था व तेथील सुविधा वाढविल्या आहेत. अशी हॉटेल अधिकृत असली तरी नियमांची अंमलबजावणी न केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
गच्चीवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला पत्राशेड किंवा कापडी मंडप टाकण्यास परवानगी नाही, असे असतानाही काही हॉटेलचालक पत्राशेड मारून तसेच विविध प्रकारची सजावट करून गच्चीवर हॉटेल सुरू केले आहे. हे संपूर्ण काम अनधिकृत तसेच, बेकायदेशीर आहेत. या ठिकाणी किचनही सुरू असल्याने आगीच्या घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या अग्रिशमन विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात ४९ रुफटॉप हॉटेल असल्याचे निदर्शनात आले होते. अग्रिशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्रिशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आली. मात्र, काही हॉटेलने नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यानंतर महापालिकने पुन्हा एकदा रुफटॉफ हॉटेलचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २१ अनधिकृत रूफटॉप हॉटेल आढळून आले. हे सर्वेक्षण अजून सुरू आहे. वाकड परिसरात सर्वाधिक १९ हॉटेल आढळून आली आहेत. पहिल्या टप्प्यात त्या हॉटेलवर कारवाई करून ती पाडण्यात येत आहेत.
शहरात एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नाही…
पिंपरी-चिंचवड शहरात किचनसह सुरू असलेले एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नाही. मात्र, काही हॉटेलचालकांनी गच्चीवर ग्राहकांना बसण्याची परवानगी घेतली आहे. अनधिकृत रुफटॉप हॉटेलवर कारवाई करून ती पूर्णपणे पाडण्यात येणार आहेत. तर, नियमांची अंमलबजावणी न केलेल्या हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेकडून ही कारवाई नियमितपणे केली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
बांधकाम विभागातर्फे बेकायदा रुफटॉप हॉटेल’चे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याविरोधात कारवाई केली जात आहे. कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा हॉटेल सुरु झाले तर गुन्हा दाखल केला जाईल.
-विजयकुमार सरनाईक, सहायक आयुक्त, महापालिका…