न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- तळेगाव दाभाडे एमआयडीसीमधील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनीत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कंपनी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेत, हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याची मागणी केली. या बैठकीला आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीमधील कामगारांनी कुटुंबासह त्यांच्या न्याय व हक्कांसाठी मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले.
जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनरल मोटर्स व ह्युंदाई कंपनीचे शिष्टमंडळ यांच्यासमवेत गुरुवारी (दि. १२) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता आमदार सुनील शेळके व कामगार संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयात ठाण मांडून बसले होते. मात्र, ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे याबाबत पुढील चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.













