न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज नागरिकांसाठी ‘ पोस्ट अ वेस्ट ’ नावाची संकल्पना सादरीकरण करून नागरिकांसाठी उपलब्ध केलेली आहे. महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in किंवा मनपाचे सारथी मोबाईल अँप याद्वारे सदर योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतात. post a waste हे नागरिकांना शहरांमध्ये कोठेही झाडांच्या फांद्या तोडून ठेवल्या असतील, काढलेले गवत इ. हिरवा कचरा, बांधकामाचा राडारोडा, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालय यांचे शिल्लक अन्न, खरकटे तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा अश्या चार प्रकारातील कचरा उचलणे व त्याबाबत तक्रारी करणेकामी ऑनलाईन स्मार्ट सारथी ऑपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर तक्रार ही महानगरपालिकेने नेमून दिलेल्या एजन्सीकडे नोंद होऊन त्वरित निपटारा करण्यासंबंधी कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सदर तक्रारी मधील असुविधेचा फोटो या एप्लीकेशन मध्ये अपलोड करून आपली तक्रार नोंदवायची आहे. या तक्रारीचा क्रमांक नागरिकांना त्वरित ऑनलाईन पद्धतीने दिला जाईल. सदर एजन्सीने तक्रारीचा निपटारा करून ऑनलाइन पद्धतीने त्याची नोंद घ्यायची आहे. जेणेकरून नागरिकास तक्रार निवारण बाबत त्वरित माहिती उपलब्ध होईल. तसेच त्या जागेचा फोटो एप्लीकेशनमध्ये अपलोड करायचा आहे. याद्वारे नागरिकांना तक्रार करते वेळेची स्थिती व तक्रारीचा निपटारा झाल्यानंतरची स्थिती फोटोच्या माध्यमातून पाहण्यास व तपासण्यास मागणी नुसार उपलब्ध राहील.
तक्रारीचा ठराविक वेळेमध्ये निपटारा न झाल्यास आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग यांच्याकडून सदर एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या स्मार्ट सारथी अँप मध्ये निर्माण करून दिलेल्या सुविधे मुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन वेळेत निपटारा होणेस मदत होणार आहे. आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान विभाग यांच्याकडून माहिती घेऊन सदर एप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. तथापि सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तक्रार नोंदवावी व समस्या निराकरण करण्यासाठी याचा वापर करावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.













