- अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांना काळं फासू; मनसेचा आयुक्तांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- कामगार कायद्याचा अवमान करून ठेकेदार मनमानी करीत आहे. सबळ कारणाअभावी कंत्राटी सफाई कामगारांना बेरोजगार केले जात आहे. त्यांना कामावरून काढले जात आहे. याबाबत मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर यांनी बेजबाबदार ठेकेदारांवर कारवाई करा, अन्यथा संबंधित ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासू , असा इशारा पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. अ, ब, क, ड, ग, ई, फ, इ या कार्यालयामध्ये निविदा प्रक्रिया राबवून सफाई ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. परंतु, या ठेकेदाराकडून वारंवार कर्मचाऱ्यांना कारण नसताना कामावरून घरी बसवले जात आहे. कर्मचाऱ्यांना सुपरवायझरकडून मानसिक त्रास देण्याचे काम ठेकेदार करत आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवून आपल्या शहरातील नागरिकांच्या कुटुंबाची संरक्षण केले आहे. याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता त्यांना कामावरून घरी बसवण्याचे काम आज महापालिकेच्या ठेकेदाराकडून होत आहे. ही तक्रार अधिकाऱ्यांकडे केली असता दखल घेतली जात नाही.
कामगार कल्याण आयुक्तांच्या नियमाप्रमाणे सफाई कर्मचाऱ्याला कोणत्याही किरकोळ कारणावरून कामावरून काढता येत नाही. तरीही ठेकेदार सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना महामारीत काम केले आणि आपले शहर स्वच्छ ठेवले. हे काम करत असताना महापालिकेचा ठेकेदार कामगार कल्याण नियम धाब्यावर बसून सुपरवायझरकडून वाटेल ती वागणूक कर्मचाऱ्याला मिळत आहे. बेजबाबदार ठेकेदारांवर कारवाई करा, अन्यथा संबंधित ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासू, असं निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे.


















