- ”एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही”..
- अंतरवाली सराटीतून जरांगे पाटलांचा सरकारला टोकाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२३) :- “दहा दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल, मराठा समाजाची नसेल. २२ ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं असेल? याची दिशा सांगितली जाईल. मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, मरेपर्यंत जाणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय तुमचा हा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही. फक्त सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. मग सरकार आरक्षण कसं देत नाही, हे मराठे बघतील. याची काळजी करू नका,” असा घणाघात अंतरवाली सराटी येथील जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“मी पुन्हा एकदा शब्द देतो, २९ ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्याच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघेल. हेच मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. २३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयीयात्रा निघणार. पुढची दिशा २२ ऑक्टोबरलाच सांगितली जाईल. मराठा समाजाने सज्ज व्हावं. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय आता माघार नाही. हे आंदोलन शांततेत होणार पण मराठे मागे हटणार नाहीत,” असंही मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी कारण ते हिंसा घडवतील अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावात घेतलेल्या सभेत उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ते असं बोलू शकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आज आंदोलन स्थळी आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंत आपलं भाषण सुरु केलं. आंदोलन घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
“त्याला (गुणरत्न सदावर्ते) यश मिळवायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांचं भलं होतंय तर सांगतो मी हिंसा घडवणार आहे. तुम्ही मला सांगा आता मला अटक करणं हे इतकं सोपं आहे का? मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जाणारा तूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला (गुणरत्न सदावर्ते) समज द्यावी. तो तुमचा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे तो तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही मराठ्यांना अंगावर घेऊ नका. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरु नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना माजी विनंंती आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. ते त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगावर घालत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि फडणवीसांना मी सांगतोय की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या हेच कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचा त्यांनी (देवेंद्र फडणवीस) बंद करावं. मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येतो. असं मनोज जरांगे पाटील यांनी आज झालेल्या आंतरवली सराटीतल्या भाषणात म्हटलं आहे.
मराठा भावांना मी सांगू इच्छितो, आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. आपण २२ ऑक्टोबर रोजी पुढची दिशा ठरवणार आहोत. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारकडे मुदत आहे. आपलं आंदोलन शांतेत होईल हे मी तुम्हाला सांगतो पण आरक्षणही तुम्हाला मिळणार. शांततेच्या आंदोलनामुळेच मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा २२ तारखेला ठरवणार. आज सरकारला विनंती आहे की लाखांनी जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल. असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो, या राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाची विनाकारण हालअपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घ्यावा. सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा जाहीर निर्णय करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही,” असंही मनोज जरांगे म्हणाले.
“केंद्राला आणि राज्याला सांगतो, आज मराठ्यांचं ‘आग्या मोहोळ’ शांत आहे, हे ‘आग्या मोहोळ’ एकदा उठलं, तर मग हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून देशाला अन्नधान्य पुरवतो. त्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. माझंही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, हे गोरगरीब मराठ्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा आरक्षण जाहीर करावं”, असंही मनोज जरांगे म्हणाले.











