न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- निगडी, प्राधिकरणातील ‘ज्ञानशक्ती’ मंदिरातील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज विविध कार्यक्रम होत आहे. अल्पावधीतच मंदिर प्रसिद्ध झाले आहे.
माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या पुढाकाराने निगडीतील सेक्टर २६ दुर्गेश्वर पथ येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी आणि गणपती अशी दोन मंदिरे शेजारी-शेजारी उभारली आहेत. तीन वर्षांपूर्वी संकेश्वर पीठाचे शंकराचार्य जगत् गुरु अभिनव विद्यानृसिंह यांच्या हस्ते मंदिरांमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या योगदानातून हे सिमेंट, वाळू, वीट बांधकाम करुन मंदिर उभारले आहे. मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेतले जातात.
नवनात्रोत्सवानिमित्त देवीला विविध प्रकारच्या साज श्रुंगाराने सजवले जाते. नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवात श्री तुळजाभवानी मातेला विविध रूपामध्ये दाखवण्यात येत असते. पहिल्या दिवशी तुळजाभवानी मातेला मयुरारुढ रुपात साकारले होते. देवी मातेची कमलासन, गजारुढ, रथ अलंकार, मुरली अलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार, महिषासुर मर्दिनी अलंकार, अन्नपूर्णा आणि सिंहारुढ अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा असे मनमोहक रूप अनुभवता येत आहे. देवीचे मनमोहक रुप पाहून भाविक आनंदी होत आहेत. अल्पावधीतच मंदिर प्रसिद्ध झाले आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मंगळवारी सार्वत्रिक सीमोल्लंघन (पालखी सोहळा) होणार आहे. २८ तारखेला कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दुर्गेश्वर चॅरीटेबल ट्रस्ट, श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने सुश्राव्य सांगितीक कार्यक्रम होणार आहे.













