- परिसरातील समस्या सोडविण्यात प्रभागातील नगरसेवकांना अपयश, नागरिकांमध्ये चर्चा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरात २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावेळी शहर भाजपने शहरातील नागरिकांना पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते. परंतू, शहरातील कारभाऱ्यांना या आश्वासनांचा विसर पडलेला दिसतो. विकासकामांच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा कोलमडलेली असून, त्यावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
महापालिकाअंतर्गत प्रभागस्तरीय सुरू असलेल्या कामांचाही विविध प्रभागात बोजवारा उडालेला दिसुन येतो. प्रभाग क्रमांक १७ चिंचवडेनगर परिसरातही विविध समस्या आ-वासून उभ्या आहेत. या प्रभागातील नागरिक विविध समस्यांमुळे मेटाकुटीला आलेले आहेत. प्रभागातील खराब व अर्धवट रस्ते, कचरा संकलनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तसेच प्रभागातील रस्त्यांवर टपऱ्या, हातगाडी चालक, चायनिज दुकाने तसेच रस्त्यांवर जागोजागी वाहनांचे अतिक्रमण, आदी समस्यांमुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिकांना रस्त्यावरून पायी चालत जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.



प्रभागातील रस्त्यांची अवस्थाही फारच बिकट आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दगडोबा चौक ते स्पाईन रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले होते. ते आता काही दिवसांपूर्वी तात्पुरते बुजवण्यात आले आहेत. त्यावर डांबरासहीत टाकलेली खडी, जागोजागी रस्त्यावर पसरलेली दिसते. असाच काहीसा प्रकार बिजलीनगर ते चिंचवडेनगर कॉर्नर रस्त्यादरम्यानच्या गुरुमैय्या शाळेसमोरही आढळून येतो आहे. अंतर्गत रस्त्यांचीही तशीच अवस्था आहे. रस्त्यांच्या या समस्यांमुळे चिंचवडेनगर परिसरात वाहने घसरुन, अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे.
तसेच या परिसरात अनधिकृत चायनीज स्टॉल, भेळ, पाणीपुरी विक्रेते व भाजी विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. सायंकाळच्या वेळेस रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असतो. रस्त्यावरच चायनीज स्टॉल थाटल्यामुळे, चायनीज पदार्थ बनविताना त्यापासून निघणाऱ्या उग्र वासाचा रस्त्यावरील नागरिकांना त्रास होतो आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचाही त्रास उदभवू लागला आहे.
मोठ्या आशेने नागरिकांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली. परंतु, प्रशासनावर जरब बसविण्यात व नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रभागातील नगरसेवकांना अपयश आले आहे, अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे. लवकरात लवकर या समस्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.










