- मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधून केला पक्षप्रवेश..
- वाढदिवशीच सत्ताधारी भाजपला दिली सोडचिठ्ठी; विधानसभा लढविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२३) :- येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये इनकमिंग व आउटगोइंगला सुरुवात झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसला असून शहरातील भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईमध्ये मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. युवा मोर्चाचे चेतन पवार यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते पवार हे नितीन गडकरी यांचे विश्वासु मानले जातात. त्यांनी २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५२ हजार मते घेतली होती. पुढे महेश लांडगे भाजपमध्ये आल्याने त्यांना विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, निवडणूक लढवण्याची त्यांची सुप्त इच्छा लपून राहिली नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपला जय महाराष्ट्र करीत असल्याचे मध्यंतरी एकनाथ पवार यांनी म्हटले होते. तसे असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात संधी मिळत नसल्याने त्यांनी गेल्या चार वर्षापासून लातूर लोकसभेत येणाऱ्या लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. तेथे सध्या शेकापचे श्यामसुंदरशिंदे आमदार आहेत. शेकाप खालोखाल त्या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळेच एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले होते आणि त्यांनी आता पक्षात प्रवेश देखील केला आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.
भोसरी मतदारसंघामध्ये एकनाथ पवार यांचे प्राबल्य आहे. महापालिकेमध्ये ते सभागृह नेते म्हणून काम पाहत होते. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता. भोसरीतून विधानसभा लढवल्याने त्यांना मानणारा वर्ग आहे. ते भाजपमध्ये नसल्यास त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे. त्यांच्या गटातील अनेक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आता पुढील राजकीय वाटचाल विधानसभा लढवण्याकडे आहे. – मा. एकनाथ पवार…