- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे मत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेला घोडेस्वारी हा मर्दानी खेळ पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना शिकविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊन शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, महापालिकेच्या वतीने कुस्ती, रोईंग, क्रिकेट, हॉकी, तिरंदाजी, धनुर्विद्या या खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दापोडी येथील लष्कराच्या सीएमईतील रोईंग सेंटरमध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्या प्रशिक्षणाचा लाभ घेत अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने त्याचा महापालिकेस फायदा झाला. तसेच, ऑलिम्पियन शूटर गगन नारंग यांच्या मार्गदर्शनखाली शहरात शूटिंग रेंजही सुरू करण्यात येणार आहे. जाधववाडी, चिखली येथे पिंपरी- चिंचवड राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. तेथे कृष्णा सामजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू, शहरातील तसेच, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणार आहे. या खेळाचा ऑलिम्पिकमध्येही समावेश झाला आहे. शहराचे सर्वसामान्य खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील.
ज्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे. ते मैदान क्रीडांगण म्हणून विकसित केले जाईल. तसे तेथे आरक्षण आहे. शहरातील तसेच, पालिका शाळेतील खेळाडूंना विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न असून, यशही मिळत आहे. सर्वसामान्य मुलांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यास कोणाची हरकत नसावी, असे आयुक्त म्हणाले.












