न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण करून घ्यावे. तसेच संस्थेच्या इमारतीचा विमा काढून घ्यावा, जेणेकरून नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत होईल. संस्थेच्या इमारतीचे फायर ऑडिट तसेच ३० वर्षांच्या पुढील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावेत, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केले. गृहनिर्माण सहकारी संस्था पदाधिकारी, संचालक व सभासदासांठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि पुणे व पिंपरी-चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सहायक निबंधक सहकारी संस्था पी. टी. घुगे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्याधिकारी एस. एस. बोडके, सहकार अधिकारी विशाल दाते, मुख्याधिकारी एम. एल. सरवदे, एम. डी. भोईर, उपमुख्याधिकारी एस. डी. आगरकर, सहकार शिक्षणाधिकारी युवराज भोसले, अजय जाधव, व्याख्याते के. उदय शंकर उपस्थित होते.
संस्थेच्या जागेचे हस्तांतरण झाल्यानंतर त्याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर झाल्याची खात्री करून घ्यावी. देखभाल खर्चाच्या रक्कमेची संयुक्त नावाने मुदत ठेव ठेवावी. झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणांतर्गत निर्माण झालेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये भाडेकरू ठेवू नयेत, असेही गटणे म्हणाले. सभासद, संचालकाचे अधिकार जबाबदाऱ्या, लेखापरीक्षण, सहकार कायदा कलम १५४ ब मधील तरतुदी, गृहनिर्माण संस्थांना लागू असणारे विविध कायदे, इमारत पुनर्विकास स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट आदीची माहिती दिली.












