न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल) :- मंगळवारी अर्ज दाखल करण्याची अवधी संपेपर्यंत ३२ उमेदवारांचे ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अर्ज छाननी करण्यात आली. या छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता मावळ लोकसभेच्या रिंगणात एकूण २८ जण शिल्लक राहिले आहेत.
उद्या शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी मावळच्या रिंगणातील एकूण उमेदवारांची स्थिती स्पष्ट होईल. यामुळे कितीजण माघार घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यात तीन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बुधवार हा उमेदवारी अर्जाच्या छाननीचा दिवस होता. चार जणांचे अर्ज विविध कागदपत्रांचा अभाव तसेच तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले.
उमेदवारी अर्ज बाद झालेल्यांमध्ये सुभाष घोलपराव बोधे, निखिल रामचंद्र हरपुडे, शाम अभिमन्यू घोडके, शिवाजी तानाजी धोंडे यांचा समावेश आहे. या चारही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज सादर केले होते.
शुक्रवार दि. १२ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून कितीजण माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात १६ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास प्रत्येक मतदार केंद्रावर दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे.










