- दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; जनअधिकार संघटनेची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- महावितरणच्या सांगवी सब डिव्हिजनमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. वीजबिल भरण्यासाठी नागरिकांची अडवणूक करून लुबाडणुकीचे धंदे केले जात आहेत. नागरिकांसोबत उर्मट भाषेत उद्धटपणे बोलले जाते. या सर्व प्रकारांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जनअधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगवी सब डिव्हिजनमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता आपले पद्धतीने कामकाज चालवतात. त्यांची कार्यपद्धत अडवणुकीची आहे. ते ठराविक ठेकेदारांचेच काम करतात. ते काम घेऊन येणाऱ्या नागरिकांशी उद्धटपणे बोलतात.
पुष्पालता शशिकांत त्रिपाठी या महिला ग्राहकाने प्रमाणिकपणे वीजबिल वेळेवर भरलेले आहे. त्यांच्या वीज मीटरमध्ये फॉल्ट झाले आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांचे वीजबिल कमी न करता त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याची दखल घेऊन वीजबिल दुरुस्ती न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.














