- पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १२ एप्रिल) :- व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, वंदन करण्यात आले. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। या ओळींचे महत्व पटवून देणाऱ्या, ज्योतिराव फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याविषयीची माहिती आपल्या चिमुकल्या शब्दात शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
जोतीराव फुले स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवणारे समाजसुधारक होते. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना ”स्त्रियांनी शिक्षण घ्यावे, यासाठी प्रवृत्त करणारे विचार मांडले. एक स्त्री शिकली म्हणजे दोन कुटुंब शिक्षित होतात. म्हणून स्त्री शिक्षण महत्वाचे आहे”, असे काटे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले
विद्यार्थ्यांच्या स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रज्ञा देशमुख यांनी केले.











