- खासगी कंपनी उभारणार ६० के.व्ही. क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- खंडित वीजपुरवठ्याचा विपरित परिणाम इंदोरी परिसरातील पाणीपुरवठ्यावर होत असल्याने खासगी कंपनीने ग्रामपंचायतीला ६० के.व्ही. क्षमतेचा सौरउर्जा यंत्रणा बसवून देण्याची तयारी दर्शवली आहे.
सरपंच शशिकांत शिंदे व ग्राम विकास अधिकारी कैलास कोळी म्हणाले,‘‘ इंदोरी येथे वरचेवर काही ना काही कारणाने वीज खंडित होत असतो. त्याचा फटका गावाच्या पाणीपुरवठ्यावर होतो. कधी कधी दोन-दोन दिवस विजेअभावी पाणी पुरवठा होऊ शकत नाही. परंतु, हा नेहमीच भेडसावणारा प्रश्न मॉडेलेज कंपनीकडून सुटणार आहे.
६० के.व्ही.क्षमतेची सौर उर्जा यंत्रणा (सोलर प्लॅंट) या कंपनीकडून उभारला जाणार आहे. तसे लेखी पत्र कंपनीने ग्रामपंचायतीस पाठविले आहे. त्यामुळे, वीज समस्येचा प्रश्न राहणार नाही. शिवाय वीज बिलाची ही मोठी बचत होणार आहे. फक्त सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर ३० के.व्ही. क्षमतेचा वीजमीटर बदलून ७५ के.व्ही.पेक्षा अधिक क्षमतेचा वीजमीटर त्वरीत बसवून घ्यावा, असे कंपनीने ग्रामपंचायतीस कळविले आहे.’’
भविष्यात पाणी पुरवठा नियमित होणार असल्याने गावात विशेषत: महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांकडून मॉडेलेज कं.व ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहे.