- वार्षिक जीवन प्रमाणपत्र मिळणार विनामूल्य; घरपोच सुविधादेखील उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी शहरातील सर्वच पोस्टांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्टांमध्ये ही सुविधा मोफत असून ज्या पेन्शनधारकांना पोस्टात किंवा बँकेत येऊन जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार नाही, अशांसाठी घरपोच सुविधा पोस्टातर्फे देण्यात येत आहे. त्यासाठी शंभर रुपये फी आकारली जात असल्याचे पोस्टातून सांगण्यात आले.
पेन्शनधारकांना प्रत्येक वर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची पेन्शन थांबवली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वर्षी हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी डिजीटल अर्थात राज्यात कोठेही पेन्शनचे खाते असल्यास तुम्हाला ज्या ठिकाणाहून शक्य आहे, तेथून हे प्रमाणपत्र सादर करता येते. त्यांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत येण्याची गरज नाही. ते डिजिटल प्रमाणपत्र सादर करू शकतात. ही सुविधा पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
जे वयोवृद्ध पेन्शनधारक आहेत, व ज्यांना बँक किंवा पोस्टात येणे शक्य नाही, अशांसाठी पोस्टमन घरी जाऊन ही सुविधा पुरवत आहेत. पोस्टात येऊन हे प्रमाणपत्र काढल्यास ते मोफत आहे. मात्र, घरपोच सेवा हवी असल्यास त्यासाठी शंभर रुपये फी आकारली जाते. तसेच ज्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत, त्यांच्या डोळ्यांचे स्कॅनीग केले जाते. ही सुविधा शहरातील फक्त चिंचवड स्टेशन येथील कार्यालयात उपलब्ध आहे, असे चिंचवड स्टेशन टपाल कार्यालयाचे जनसंपर्क निरीक्षक के. एस. पारखी यांनी सांगितले.