- मॉलसमोरच तरुणाचा गळा आवळून टोळक्याकडून पट्ट्याने अमानुष मारहाण..
- गुन्हेगार अद्यापही मोकाट…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :- रहाटणीतील एका मॉलसमोर किरकोळ अपघातानंतर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता कुणाल विलास पालवे (वय २७, रा. रहाटणी) हे त्यांच्या अॅक्टीवा दुचाकीवरून बीआरटी मार्गाने जगताप डेअरी चौकाकडे जात होते. त्यावेळी एका मॉलसमोर त्यांच्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलचा अपघात झाला.
यानंतर काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या आरोपींनी अपघाताची चूक फिर्यादीची असल्याचे सांगत वाद घातला. यावेळी बाबू पाटील याने फिर्यादीचा गळा दाबला, तर त्याच्या साथीदारांनी बेल्ट, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली. या मारहाणीत फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बाबू पाटील, अभिषेक माडगुळे, विकी सुतार व एका अन्य व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि मेटे करीत आहेत.












