- स्वीकृत नगरसेवकपदी सचिन साळुंके आणि प्रदीप परंडवाल यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २४ नोव्हेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतच्या नगरसेविका पूजा अमोल दिवटे यांची देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षापदी तर, उपनगराध्यक्षपदी सुधीर (बंडा) काळोखे यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी सचिन साळुंके आणि प्रदीप परंडवाल यांची निवड करण्यात आली आहे. आज शुक्रवारी (दि. २४) रोजी ही निवडणूक पार पडली.
देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य पदाची निवडणूक आज शुक्रवारी (दि. २४) रोजी विशेष सभेत देहू नगरपंचायत कार्यालयात संपन्न झाली. नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे या पदाची निवडणूक झाली. हवेलीचे प्रांताधिकारी या विशेष सभेचे पीठासन अधिकारी होते.
देहूचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे. सध्या देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (अजित पवार गट) सत्ता आहे. नव्याने स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव आहे. याआधी स्मिता चव्हाण या नगराध्यक्षपदी विराजमान होत्या. काही कारणास्तव चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. या पदासाठी प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका पूजा दिवटे यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज पार पडलेल्या निवडणुकीत पूजा दिवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


















