न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- देवगड येथील समुद्र किनार्यावर पिंपरी चिंचवडची पाच मुले बुडाल्याची माहिती शनिवारी सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान, बुडालेले ५ जण हे खासगी सैनिकी अकादमीमधील मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुडालेल्यांमध्ये ४ मुलींचा तर एका मुलाचा समावेश आहे.
शनिवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खासगी सैनिकी अकादमीतील सुमारे ३५ जणांची सहल देवगडला गेली होती. आंघोळीसाठी ते ५ जण समुद्रात गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
मृतांमध्ये अंकिता गालटे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे आणि पायल बनसोडे यांचा समावेश आहे तर राम डिचोलकर हा बेपत्ता आहे. दरम्यान, शोधकार्य युध्दपातळीवर सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.












