न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यावर्षीही दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांसाठी नागरिक आणि विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजनासंदर्भातील सूचना लेखी स्वरुपात पिंपरी येथील महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभागात प्रत्यक्ष सादर कराव्यात अथवा pro@pcmcindia.gov.in या मेलवर दिनांक २२ डिसेंबर सायं ५.०० वाजेपर्यंत पाठवाव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती ही शासनाच्या वतीने महिला शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे दरवर्षी दि. ३ जानेवारी रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षीही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता नागरिक, सामाजिक संघटना आणि संस्था आदींकडून प्रबोधन पर्वानिमित्त सूचना मागविण्यात येत आहेत, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

















