न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे. कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे.
महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया… जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया… अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-प्रथा-परंपरा नष्ट करुया… सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करुया… आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र घडवूया..,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.