न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारीत ४.५१९ किलोमीटर अंतराच्या मार्गावर डीपीआरमध्ये केवळ तीन मेट्रो स्टेशन होते. मात्र, नागरिकांच्या सुविधेसाठी निगडी येथील टिळक चौकात आणखी एक स्टेशन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना मेट्रो प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
महामेट्रोने केलेल्या डीपीआरमध्ये चिंचवड स्टेशन चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे असे एकूण ३ स्टेशन प्रस्तावित होते. त्याच कामांच्या डीपीला महापालिका राज्य शासनाने मंजुरी दिली. केंद्र शासनाने या विस्तारीत मार्गाच्या ९१० कोटी १८ ला खर्चास २३ ऑक्टोबर २०२३ ला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर महामेट्रोने वेगात निविदा पूर्व तयारी करून निविदा १९ डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध करण्यात आली. त्यात तीनऐवजी चार स्टेशनचा उल्लेख करण्यात आला आहे. चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ, भक्ती शती समुह शिल्प चौक, तसेच निगडी येथील टिळक चौक येथे चौथे स्टेशन बनविले जाणार आहे.
टिळक चौकात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते, कामगार, विद्यार्थी व नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. तेथे बस व रिक्षांना मोठी गर्दी होते. नागरिकांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन महामेट्रोने टिळक चौकात स्टेशनचा निर्णय घेतला आहे. या चार स्टेशनमुळे पिंपरी- चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड महापालिका, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी असे एकूण १० स्टेशन होतील.
निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प स्टेशनपर्यंत जाण्यासाठी निगडी व प्राधिकरणातील नागरिकांना अधिक अंतर पडत होते. त्यामुळे त्यांना रिक्षा, बस किंवा स्वत:चे वाहन वापरावे लागणार होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वर्दळीच्या निगडीच्या टिळक चौकात मेट्रो स्टेशन बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या भागांतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे अधिक सुलभ व सोईचे होणार आहे असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.














