- आपची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२३) :- महापालिका जनसंवाद सभेत तक्रारी मांडूनसुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करीत नाहीत किंवा कामचुकारपणा करत असतात, असा आरोप आपचे नेते यल्लप्पा वालदोर ह्यांनी केला.
यलप्पा वालदोर यांनी थेट आयुक्त शेखर सिंह यांना लेखी पत्र ईमेलवर पाठवून मागणी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जनसंवाद सभेत ज्या तक्रारी मांडल्या होत्या ते पूर्ण न करणारे संबंधित विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी. अशी कारवाई जर एकदा झाली तरच अधिकारी कामे करतील. अन्यथा जन संवाद हा फक्त संवाद करण्यापुरताच राहील.
साधारणतः दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे जनतेला प्रभागातील कामाची तक्रार करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहेत. सध्या पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून घेऊन जनतेच्या कामे कुठेही थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

















