न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यात गेल्या दोन तासांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. आज मंगळवारी अचानक आलेल्या पावसाने सामान्य नागरिकांची दाणादाण उडवली.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. थंडी काहीशी कमी झाली आहे. सोमवारी सायंकाळी काही प्रमाणात आभाळ भरून आले होते. मात्र, पाऊस आला नाही. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मंगळवारी सकाळी चिंचवड परिसरामध्ये हलक्याशा सरीवर बरसल्या. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. पुन्हा दुपारी साडेबारा नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्रच दुपारी साडेबारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत मोठा पाऊस पडत होता.
पावसाचा जोर कमी असला तरी वातावरणामध्ये गारठा जाणवत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दुपारच्या वेळेस सुटणाऱ्या शाळकरी मुलांची गैरसोय झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या तसेच कामावरून घरी परतणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय झाली.














