- प्रसंगी बदली देखील होऊ शकते?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याविषयी असलेली दोन्ही नेत्यांची नाराजी दिसून आली. महापालिकेच्या नाट्यगृहांकरिता आकारला जाणारा अव्वाच्या सव्वा दराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली, तर महापालिकेच्या काही विषयांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हस्तक्षेप करावा लागत आहे, ही परिस्थिती महापालिका आयुत शेखर सिंह यांच्या दृष्टीन अडचणीची ठरू शकते.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकर प्रशासक राजवटीचा अनुभव घेत आहेत. या कालावधीत महापालिकेचा कारभार ढेपाळला आहे. लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयोजित केल्या जाणाऱ्या जनसंवाद सभांची संख्या कमी करण्यात आली आहे. आजमितीस आयुक्तांच्या सह्यांकरिता फाइलींचा ढीग पडला आहे. मात्र, त्या फाइलॉवर सह्या करण्यासाठी आयुक्तांना वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
प्रशासकीय राजवटीत आपल्या समस्या सुटत नसल्यास अनेक नागरिकांना, विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना आयुक शेखर सिंह यांच्या कानावर ही बाब घालणे योग वाटते. मात्र. त्यांच्याकडे गेल्यानंतर देखेंगे, करेंगे अशी ठराविक साचेबद्ध उत्तरे दिली जात असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदुषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बोट दाखविले जात आहे. मात्र, इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत महापालिकेला यापूर्वीच दंड ठोठविण्यात आला असल्याची बाब आयुक्त व संबंधित अधिकारी सोयीस्करपणे विसरून गेले आहेत. प्रदूषणासाठी महापालिकेच्या हद्दीतील सांडपाणी वाहून नेणारे नालेदेखील जबाबदार असल्याची बाब विसरता येत नाही, महापालिका प्रशासकीय प्रमुख या नात्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब यानिमित्ताने वारंवार समोर येत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना अडचणीची ठरू शकते. प्रसंगी बदली देखील होऊ शकते.