- पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारुप विकास आराखड्याच्या (डीपी) मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २४ जानेवारीला बैठक आयोजित केली आहे. बैठकीत आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री है पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे ‘डीपी’ मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी पीएमआरडीए प्रशासनाकडून वेळोवेळी नियोजन करण्यात आले. मात्र, शिंदे यांच्या व्यग्रतेमुळे यापूर्वी चार वेळा या नियोजित बैठका रद्द झाल्या. डीपी सादर करण्याची मुदत २० डिसेंबर २०२३ रोजी संपली, २७ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे मुदतीत डीपीच्या मंजुरीसाठी बैठकीचे नियोजन करण्यात आहे.
मुख्यमंत्र्यांच्याअध्यक्षतेखालील बैठकीत नियोजन समिती आणि प्राधिकरण समितीसमोर डीपी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हा डीपी न्यायालयाकडे सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८१४ गावांसाठी पीएमआरडीएने ३० जुलै २०२१ रोजी विकास आराखडा प्रकाशित केला होता. पीएमआरडीएने नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या, ज्यावर ६१ हजार २०० हरकती व सूचना प्राप्त झाल्या, दाखल हरकती-सूचनांचे नियोजन करून तज्ज्ञांच्या समितीने सुनावणी घेतली.