न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन टप्यात सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत. आणखी काही बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांची सहायक आयुक्त, प्रशासन येथे बदली करण्यात आली आहे. तर घनवट यांच्या जागी प्रशासनाचा कार्यभार असलेले सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे देहूरोड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह २४ सहायक निरीक्षक आणि २८ उपनिरीक्षकांची देखील बदली केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे एक) बाळासाहेब कोपनर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे बदली झाली. पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे वाहतूक शाखेत बदली झाली. तर भोसरी एमआयडीसी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्याकडे गुन्हे एकची विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे
आयोगाच्या आदेशानुसार पोलिस ठाणे हे कार्यकारी पद गृहित धरण्यात आले आहे. तर, अन्य सर्व शाखा य अकार्यकारी समजण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कार्यकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना साईड ट्रॅक करण्यात आले आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अधिकाऱ्यांची कार्यकारी पदांवर म्हणजेच पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.














