- येलवाडी, सांगुर्डीकर ग्रामस्त सतंप्त; आंदोलनाचा दिलायं इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- खेड तालुक्यातील येलवाडी मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. देहू फाटा ते सांगुर्डी फाटा दरम्यान खड्डे पडले आहेत. खड्डे अधिक खोलीचे आहेत. वाहनांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने ही वाहने आदळत असल्याचे ग्रामपंचायत सदस्या ऊर्मिला गायकवाड तसेच ग्रामस्थ बाजीराव गायकवाड, पोपट केळकर, तुषार गाडे, गोरख बोत्रे, दशरथ बोत्रे यांनी सांगितले. दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने खड्ड्यांप्रश्नी पीडब्ल्यूडीला पत्रव्यवहार केल्याची माहिती ग्रामसेविका पी. एस. शेवाळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जून २०२२ मध्ये देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विशेष कार्यक्रमासाठी आले होते. त्यासाठी येलवाडी रस्त्याचे कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढून डांबरीकरण युद्धपातळीवर हाती घेतले होते. मात्र, नंतर काही दिवसांत झालेल्या वाहतुकीनंतर रस्ता खचला असल्याचे असे बाजीराव गायकवाड यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्ड्यांसह गतिरोधकांवरील पांढरे पट्टे दिसेनासे झाले आहेत. या त्रासातून आम्हाला मुक्त करा, अशी मागणी अशी देहू, येलवाडी व सांगुर्डी ग्रामस्थांनी केली आहे.
‘‘रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खेड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आतापर्यंत दहा वेळा सांगूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे लवकरच आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
– रणजित गाडे, सरपंच, येलवाडी
या रस्त्यावरील खड्डे डांबराच्या साह्याने बुजविणार आहोत. देहू-येलवाडी रस्त्यावर पीएमआरडीए निधी देणार आहे. त्यांच्याकडून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.’’
– जानव्ही रोडे, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हवेली