मावळ लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट; जागेवर भाजपचा दावा?..
भाजपकडून उमेदवारीसाठी शंकर जगतापांच्या नावाला पसंती?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या सत्ता संघर्षांनंतर मावळ लोकसभेचे खा. श्रीरंग बारणेंनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी घरोबा केला. तर, शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत कुटुंब थाटलंय. शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. हा उलटफेर झाल्यानं श्रीरंग बारणेंसमोर मोठा पेच निर्माण झालाय. सत्ता संघर्षाच्या दोन भूकंपांमुळं मावळ लोकसभेत भाजपची ताकद भक्कम झाल्याचं चित्र कागदावर दिसतेय. त्यातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि टीमवर जहरी आसूड उगारण्याचा पण केलाय. जनमताला भावनाविवश करून शिंदे सरकारपुढे ते आगामी निवडणुकीसाठी अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेला विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यास महायुतीतील घटक पक्षांकडून आतून विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असणाऱ्या मावळ लोकसभेवर भाजपने दावा ठोकलाय. दिवंगत आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे नाव मावळ लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवाराच्या रूपाने पुढे केले जात असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
2019 च्या लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचे पानिपत करून तत्कालीन शिवसेनेचे श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा खासदार झालेत. श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केल्यामुळे तो पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. अजित पवारांनी देखील ही सल अनेकदा खासगीत बोलून दाखविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून खा. बारणे यांना उमेदवारीसाठी किती पाठींबा मिळतो? यावर देखील प्रश्नचिन्हच आहेत? त्यामुळे बारणे यांची चिंता वाढलेली आहे.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी 2019 प्रमाणेच 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा अट्टाहास धरला तर? 2019 च्या पराभवानंतर पार्थ पवार मावळ लोकसभेत त्यांच्या मर्जीनेच फिरकत असल्यानं ते इथल्या मतदारांसाठी “ईद का चांद” झालेत. त्यांचा हा जनसंपर्क पाहता ते पुन्हा जनतेतून निवडणूक लढण्याचं धाडस दाखवतील का? असा प्रश्न निर्माण केला जातो.
दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख फ्लेक्सवर केला अन मतदारसंघात ते फ्लेक्स सर्वत्र झळकवले. बरं ही ईच्छा फक्त कार्यकर्त्यांचीच नाही तर भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर मी लोकसभेच्या रिंगणात उभा राहीन, असं स्वतः भेगडेंनी वक्तव्य केलंय. त्यामुळं तिकीट मिळविण्यासाठी बारणेंच्या ‘बाणा’ला आधी ‘कमळा’ला ही भेदावं लागणार आहे. हे दावे-प्रतिदावे केले जात असतानाच बारणेंनी गेल्या दहा वर्षात मतदार संघासाठी काय केलं? असा सवाल थेट मित्र पक्षांकडूच विचारला जातोय. आता ज्यांच्या जीवावर लोकसभेत पोहचण्याचं स्वप्न बारणेंनी पाहिलंय, त्या राष्ट्रवादी आणि भाजपकडून असे डावपेच खेळले जातायेत. म्हणूनच बदलेल्या या परिस्थितीमुळं बारणे आणखीच धर्मसंकटात अडकलेत, हे नाकारून चालणार नाही.
भाजप या क्षणी कुठलाही धोका पत्करण्याची शक्यताच नाहीच. त्यामुळे भाजपने मावळच्या जागेवर हक्क दाखवण्यास सुरुवात केली आहे. श्रीरंग बारणे यांच्या जागी भाजपने स्वतःचा उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट त्या उमेदवाराचे काम जोमाने करेल, मावळची जागा जिंकणे सोपे होईल, अशी अटकळही भाजपकडून दुसरीकडे बांधली जात आहे. त्यामुळ भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यानंतर आता भाजपा शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांचे नाव सुद्धा चर्चेत आले आहे. लक्ष्मणभाऊ जगताप यांची 2009 पासून मावळचे खासदार होण्याची इच्छा होती. ती अपूर्ण इच्छा शंकर जगताप यांनी पूर्ण करावी, अशी मागणी खुद्द शहर भाजपकडून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शंकर जगताप यांना भाजपने उमेदवारी दिल्यास भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून भाजपची जागा नक्कीच जिंकू शकतात, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना आहे. भाजपाचे पक्षश्रेष्ठी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकर जगताप यांना पाठिंबा देणार का? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तूर्तास तरी, महायुतीकडून मावळ लोकसभेसाठी खा. श्रीरंग बारणे, पार्थ पवार, बाळा भेगडे आणि शंकर जगताप यांच्या नावांच्या चर्चेवर खल सुरु आहे. काहीही असो महायुती आणि त्यात भाजपला उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्चित आहे.
महायुतीत अशी चुरस निर्माण झालेली असताना महाविकास आघाडीच्या गोटातून उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना मावळातून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. वाघेरे यांनी मावळात तसा जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यास देखील सुरुवात केली आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ज्याप्रकारे भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या धर्मपत्नी आ. अश्विनीताई जगताप यांना भावनिक लाटेवर निवडून आणले. पुन्हा तशा प्रकारचे भावनिक वातावरण भाजपला मावळचा गड सर करताना कामी येईल, असा मतप्रवाह आहे. दिवंगत आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांचं खासदार होण्याचं स्वप्न त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्या रूपाने साध्य करण्यासाठी जनमताला साद घालता येईल? असाही एकविचार पक्षातूनच पुढे येऊ लागला आहे.