- अन्यथा ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घर देणं शक्य नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील ९३८ सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली. यावेळी भाषण करताना अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घर देणं शक्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील कार्यक्रमात त्यांनी हे मिश्किल वक्तव्य केलं.
अजित पवार म्हणाले, बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा. तेवढं करा, कारण मी काही वर्षापूर्वी खासदार झालो. तेव्हा लोकसंख्या काय होती अन् आता ३३ वर्षांनी किती झालं. मग ब्रह्मदेव जरी आला तर सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही. सकाळी ९ वाजता कार्यक्रम घेतल्याने काहींची अडचण झाली. परंतू सकाळ-सकाळी सुरुवात केली तर कामे लवकर होतात, असे देखील अजित पवार म्हणाले.

















