- ‘ह्रदयात राम आणि हाताला काम’; असे आमचे हिंदुत्व..
- आदित्य ठाकरे यांची पिंपरीत चौफेर फटकेबाजी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२४) :- ‘ह्रदयात राम आणि हाताला काम’, ‘प्राण जाये पर, वचन न जाये’ असे आमचे हिंदुत्व आहे,’’ असा नारा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिला. धर्माधर्मात, जातीजातीत, जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण करणे, हे भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व आहे.
केंद्र व राज्य सरकारचा कारभार आणि आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा रविवारी पिंपरीत झाली. त्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. तत्पुर्वी निगडी येथील भक्तीशक्ती चौकात त्यांचे स्वागत केले. तेथून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत दुचाकी फेरी काढली. सभेस जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर, राज्य संघटक गोविंद घोळवे, एकनाथ पवार, मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात, ‘ईव्हीम हटाव, संविधान बचाव’ असा फलक होता. त्याला उद्देशून ठाकरे म्हणाले, ‘‘ईव्हीएमपेक्षाही खोके सरकारपासून महाराष्ट्र बचाव, असा नारा लावायची वेळ आलेली आहे. दोन पक्ष व एक कुटुंब फोडून अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवलं आहे. चाळीस चोरींची ही टोळी आहे. त्यांचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. पण, सध्याचे वर्ष निवडणुकांचे असून आमचे आहे.
पुढील दोन महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होईल, कदाचित विधानसभेचही निवडणूक होईल. त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. त्यावेळी घोटाळेबाज मंत्र्यांना अगोदर जेलमध्ये टाकू,’’ असा इशारा देत, मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर, त्यांनी राज्यहिताचा निर्णय घेऊन दाखवावा, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले. सुलभा उभाळे, गोविंद घोळवे यांचीही भाषणे झाली. काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यांचे स्वागत ठाकरे यांनी केले.















