न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय तसेच रुग्णालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडील विभागप्रमुख म्हणून सोपविलेला कार्यभार निरस्त करण्यात आला असून ते केवळ रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामकाजाच्या मर्यादेत प्रमुख राहतील. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
रुग्णालय प्रशासन हे आरोग्य सेवा वितरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. सद्यस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण तसेच आंतर रुग्ण विभागावर होत आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तसेच दैनंदिन रुग्णालयीन व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचा अतिरिक्त ताण अधिष्ठाता यांच्यावर येत आहे. त्यामुळे रुग्णालयामार्फत आरोग्य सेवांचे कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी दैनंदिन कामकाजावर देखरेख, धोरणात्मक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, मानवी संसाधने, पेशंट केअर मॅनेजमेंट, अनुपालन आणि नियमन, सुविधा व्यवस्थापन, जनसंपर्क आणि सामुदायिक सहभाग, जोखीम व्यवस्थापन, गुणवत्तेची सुधारणा इत्यादी कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. या बाबी विचारात घेता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय विभागप्रमुख पदाची जबाबदारी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (पदव्युत्तर पदवी संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामराज वगळून) कार्यकक्षाच्या मर्यादेत विभागप्रमुखांना प्रदान केलेले प्रशासकीय व वित्तीय अधिकारांचा वापर करावा. तसेच त्यांनी वैद्यकीय विभागाकडील मुळ पदाचे इतर कामकाजही करावे, विभागप्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या शिस्तभंग विषयक कारवाईचे अधिकार सक्षमपणे वापरावेत, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत औषध भांडार, साहित्य भांडार विषयक सर्व कामकाज व आवश्यकतेनुसार प्रदान केलेल्या वित्तीय अधिकाराच्या मर्यादेत राहून औषध, साहित्य व उपकरणे खरेदी करणे, आवश्यकता असल्यास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे विद्यमान कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नियोजन व समन्वय साधून सुव्यवस्थापन करावे असे आदेशात नमूद करण्यात आले असून अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी यांच्यामार्फत होणारा पत्रव्यवहार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असा राहणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी संस्थेच्या अनुषंगाने शैक्षणिक बाबींशी संबधित जबाबदाऱ्या व कर्तव्ये सुनिश्चित केल्याप्रमाणे संपुर्ण कामकाज करावे. त्यामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच व्यवस्थापनाकरीता आवश्यक अध्यापक वर्गाचे कामकाजाचे नियोजन व नियंत्रण करणे, पदव्युत्तर अंतर्गत नेमणूक झालेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक तसेच त्यांचे वेळापत्रक, परीक्षा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक पदांची भर्ती प्रक्रिया व पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया इत्यादी सर्व कामकाज करणे, अधिष्ठाता यांनी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी लागणारे मनुष्यबळ कुठल्याही प्रकारची सबब अथवा टाळाटाळ न करता उपलब्ध करून द्यावे, पदव्युत्तर पदवी संस्था व्यवस्थापनावरील सर्व गट अ ते ड संवर्गातील कार्यरत अध्यापक व कर्मचारी वर्गापुरते मर्यादित नियंत्रण व शिस्तभंग विषयक कारवाईचे अधिकारी सक्षमपणे करावेत, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाशी संबंधित सादर होणाऱ्या नस्त्या तसेच धोरणात्मक निर्णय संबंधित अतिरिक्त आयुक्त यांच्यामार्फत आयुक्त यांच्याकडे सादर कराव्यात, आवश्यक असल्यास पदव्युत्तर पदवी संस्थेच्या विद्यमान कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नियोजन व समन्वय साधून सुव्यवस्थापन करावे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यामार्फत सादर होणाऱ्या नस्त्या तसेच धोरणात्मक निर्णयांबाबत थेट निंयत्रण तसेच अधिकारांमध्ये बदल करणे अथवा निरस्त करणे याबाबतचे हक्क आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.













