न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२० एप्रिल २०१९) :- क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ढोल-ताशे लेझिमचा गजर करण्यात आला. राष्ट्रकार्यासाठी एकाच घरातील तीन बंधूंनी भारतमातेसाठी आपले बलिदान दिले.
त्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन फेरीची सुरुवात क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर चिंचवडच्या प्रांगणातील दामोदर हरी चापेकर यांच्या प्रतिमेस क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतिश गोरडे यांच्या हस्ते हार घालून झाली.
या अभिवादन फेरीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे विद्यार्थी, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर व विद्यालयाचे विद्यार्थी, लोकमान्य टिळक विद्यालय व खिवसरा पाटील विद्यामंदिर थेरगाव येथील विद्यार्थी व ४ शाळेतील शिक्षक सामील झाले होते. ही अभिवादन फेरी संपूर्ण चिंचवडगावातून काढण्यात आली.
चापेकरचौकातील दामोदर, बाळकृष्ण वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांच्या पुतळ्यास हार घालून चापेकर बंधूंच्या राहत्या वाड्यापर्यंत काढण्यात आली. चापेकर बंधूंचा इतिहास वर्णन करणारा, रँडचा वध का व कसा केला याचे वर्णन करणारा, शौर्य रसाने रोमांच उभे करणारा आसारामजी कसबे यांनी रचलेला पोवाडा बालशाहीर सिद्धेश केसकर व त्याचे सहकारी यांनी सादर केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजनात अतुल आडे, शुभदा साठे, दादासाहेब खेडकर या शिक्षकेतर कर्मचार्यांनीही सहभाग घेतला.











