- समिती कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २० एप्रिल २०१९) :- बिजलीनगर – वाल्हेकरवाडी चौकात मंगळवार (दि. ९ ) रोजी रात्री १०. ०० वाजता मोठी दुर्घटना घडता-घडता टळली. बिजलीनगर ते गुरुद्वारा भुयारी रस्त्याचे काम सुरू आहे. पुलाच्या दोनही बाजूला असणाऱ्या टेलिफोनच्या खांबांचा वापर अनेक प्रकारच्या केबल्स व तारा वाहून नेण्याकरीता केला गेला. परंतु, केबलच्या अतिरिक्त ताणामुळे दोनही बाजूचे खांब झुकले गेले व सदरच्या तारा व केबल पुलावर खालील बाजूला झुकला गेला.
मोठया जड मालवाहतूक करणाऱ्या ट्रेलर ट्रकमुळे सदरच्या या केबल्स पुलाच्या रस्स्यावर खाली लोंबकळु व लटकू लागल्या. त्यातच प्राधिकरणाकडून आलेल्या “इंडेन” कंपनीचा गॅस वाहतूक करणारा टेम्पो त्या केबल्समध्ये अडकला, उजवीकडील पुलावरील खांब त्यामुळे आतील बाजूला झुकला. घाबरून त्या टेम्पो चालकाने रस्त्यावर उडी घेतली. या घटनेमुळे प्राधिकरण भक्ती शक्ती चौकाकडून येणारी वाहनांची लांब रांग लागली.
वाहतूक खोळंबा झाल्यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, बाबासाहेब घाळी यांनी त्वरित बिजलीनगर चौकाकडे धाव घेतली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केबल्समध्ये अडकलेल्या टेम्पोची सुटका केली. वाहतूक नियंत्रण करून, रहदारीत अडकलेल्या वाहनांना वाट मोकळी करून दिली. अडकलेल्या तारा व केबल्समध्ये अडकलेल्या गॅस सिलेंडर वाहतूक टेम्पोची सुटका केल्यामुळे मोठा अपघात टळला.
“भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलावर अतिरिक्त वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. खाजगी कंपन्या तसेच बीएसएनएल कंपनीच्या केबल्समुळे दुचाकी धारकांच्या अपघातांची शक्यता बळावली आहे. अश्या केबलची योग्य व्यवस्था महापालिका प्रशासनाने त्वरित करावी. तसेच भुयारी काम करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळले गेले पाहिजे. सध्या बिजलीनगर चौक असुरक्षेच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे बिजलीनगर चौक धोकादायक बनला आहे. नागरिकांनी सावधानतेने या चौकाचा वापर करावा.” – विजय पाटील (अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती)










