- जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य रॅलीचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. सगेसोयरे यांना जात दाखले देण्याचा अध्यादेश काढला. त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आरक्षण आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.
त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवार दिनांक १४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तसेच बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार दिनांक १४ रोजी सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भव्य दुचाकी व चार चाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीची सुरवात बुधवारी सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात येणार आहे. सदर रॅली तेथून पुढे काळेवाडी फाटा, जगताप डेअरी,रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे जाणार आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सदर रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी कडे जाणार आहे.सदर रॅली तळेगाव मार्गे वडगाव कडे रवाना होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार आहे. सदर रॅलीचे नियोजन सतिश काळे,सचिन बारणे,प्रकाश जाधव,भाऊ ढोरे,वैभव जाधव,नरेंद्र मुर्हे,अमोल ढोरे,नकुल भोईर,रावसाहेब गंगाधरे,विशाल मुर्हे,गणेश देवराम,संतोष शिंदे,सागर चिंचवडे,अरुण पवार,लहू लांडगे शिवाजी पाडुळे,पोपट काळभोर, मारुती भापकर,सुनिता शिंदे,सचिन काळभोर इत्यादी कार्यकर्ते करत आहेत.











