न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परकीय नागरिक नोंदणी (FRO) विभागाने आयुक्तालयाच्या हद्दीत मेडीकल व आयुष व्हिसा पोर्टल वापराबाबत सर्व रुग्णालय, आरोग्य केंद्र, योगा सेंटर यांच्यासाठी अधिसुचना जारी केली आहे. या सर्व रुग्णालयांना यापुढे indian frro.gov.in/frro/medicalvaluetravel/ वर लॉग इन करून पुढील प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार आहे.
अधिसुचनेत म्हटले आहे की, देशातील वैद्यकीय व्हिसा सेवा सुव्यवस्थित व नियमित करण्यात येत आहेत. तसेच रुग्णालये, आरोग्य केंद्र यांच्याकडून परकीय नागरिकांना पुरवण्यात येणा-या वैद्यकीय सेवांसाठी वैद्यकीय व्हिसा इन्व्हीटेशन पत्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी फॉर्म सी पोर्टलमध्ये “Medical and Ayush Visa Portal” हा भाग नव्याने विकसित करण्यात आला आहे.
मेडीकल व आयुष व्हिसा पोर्टलचा उद्देश रुग्णालयांना indianfrro.gov.in/frro / medicalvaluetravel/ चा वापर करुन वैद्यकीय व्हिसा इन्व्हीटेशन पत्रे व वैद्यकीय व्हिसा इन्व्हीटेशन पत्रे सोयीस्कररित्या तयार करणे हा आहे. रुग्णालये, आरोग्य केंद्रे, योगा सेंटर यांनी या पोर्टलवर नोंदणी करुन मेडीकल व्हिसा आदींची त्यात परकीय नागरिकांची संपूर्ण सविस्तर माहिती भरणे अपेक्षित आहे. फॉर्म सी च्या पोर्टलवर जी रुग्णालये आहेत ती नोंदणीकृत असल्याचे मानले जाईल. हे पोर्टल वापरुन तयार करण्यात आलेल्या मेडीकल व्हिसा इन्व्हीटेशन पत्रामध्ये युनिक आयडी UID नमुद असेल. सदरचा युनिक आयडी अर्जदाराने (परकीय नागरिकाने) व्हिसा अॅप्लीकेशन फॉर्ममध्ये नमूद करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त रुग्णालयांनी फॉर्म सी नेहमीप्रमाणे भरावयाचे आहेत. याबाबत कोणतीही शंका असल्यास परकीय नागरिक नोंदणी विभाग (FRO) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.