न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन आणि वेन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात जेष्ठ नागरिकांची रक्तदाब आणि शुगरची तपासणी करण्यात आली.
दरम्यान वेन्सर हॉस्पिटलचे डॉ. भूषण शितोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या गुडघेदुखीच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. उतारवयात उद्भवणारी गुडघेदुखी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, व्यायाम, आहार याबाबतही डॉ. शितोळे मार्गदर्शन केले. गुरुवार दि. २९ रोजी कुणाल आयकॉन रोडवरील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी तसेच अनिल कुलकर्णी, विवेकानंद लिगाडे, श्रीकृष्ण निलेगावकर, सखाराम ढाकणे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ” संगीत सरीता ” या गायन स्पर्धेत प्राविण्य मिळवल्याबद्दल सुरेंद्र पागेदार आणि बाळकृष्ण चौधरी यांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. उन्नती सोशल फाऊंडेशनचे संचालक डॉ. कुंदाताई भिसे, संजय भिसे, तसेच काटे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ. अपुर्वा शिरोडे तसेच विशाखा मोरे आणि योगेश जगताप यांनी परिश्रम घेतले.











