महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्कीचे प्रकार वाढले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- वीजग्राहकांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे बकीत वीजबिलांची वसुली मोहीम राबवित आहेत. यात थकबाकीदार ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या सरकारी कामात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार होत असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई तत्काळ करण्यात येणार आहे.
गेल्या पाच महिन्यांत पश्चिम अभियंता, महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करण्याचे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात एकूण १३ प्रकार घडले आहेत. या प्रकरणातील १९ आरोपीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तसेच आरोपींच्या अटकेचीदेखील कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच, विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. मात्र, ती अव्हेरून शिवीगाळ व मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरावरून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे. महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीजबिल नियमित भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकते नुसार स्थानिक पोलिस विभागाचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केली आहे. तसेच, व्यवस्थापनसंबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीमधून नाळे यांनी दिली. वीजग्राहकांनीदेखील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.











