- सुरळीत वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव आक्रमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- परीक्षा काळामध्ये सातत्याने होत असलेल्या खंडीत विजपुरवठ्यामुळे दहावी व बारावीचे विद्यार्थी हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत अभ्यास करायचा तरी कसा, असा प्रश्न या परीक्षांर्थींना पडला आहे. सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या संदर्भात युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या चिंचवड विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देशमुख यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चंद्रशेखर जाधव, सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, जिफिन जॉन्सन, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप यांच्यासह शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, सध्या शालेय परीक्षांचे दिवस चालू असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. याचा नाहक त्रास या परीक्षार्थींना होत असून पालकवर्ग देखील हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे किमान या परीक्षा काळात तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याबाबत सकारात्मक भूमिका घेत महावितरणच्या वतीने वारंवार खंडित करण्यात येणारा हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी विनंती चंद्रशेखर जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.











