- महाराष्ट्रात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांना प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकीसाठी आज शनिवारी (दि. १६) रोजी पत्रकार परिषद नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडली. यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. देशात १९ एप्रिलपासून निवडणुकांना प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा १३ मे, पाचवा २० मे, सहावा २५ मे आणि सातवा टप्पा १ जून या दिवशी देशात मतदान होणार आहे. चार जूनला देशात मतमोजणी होणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर – दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगड आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा २६ एप्रिल, तिसरा ७ मे, चौथा १३ मे आणि पाचवा २० मे रोजी मतदान होणार असून, ४ जूनला अंतिम निकाल हाती येणार आहे.
महाराष्ट्रातील पाच टप्पे :-
पहिला टप्पा – १९ एप्रिल :- रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
दुसरा टप्पा- २६ एप्रिल :- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा- ७ मे :- रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा- १३ मे :- नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
पाचवा टप्पा- २० मे :- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, तसेच मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य या सहा मतदारसंघांचीही निवडणूक या दिवशीच होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले, ” भारत ही जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही आहे. २०२४ मध्ये जगातल्या महत्वाच्या देशात सर्वात मोठ्या निवडणुका होत आहेत. १६ जूनला १७ व्या लोकसभेचा कार्यकाल संपतोय. या निवडणुका घेणं मोठ आव्हान आहे. ८०० जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा केली आहे. दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु आहे. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. देशात साडेदहा लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत. अकरा राज्यातल्या निवडणुका शांततेत पार पडल्या. आमच्यावरच्या कोर्ट केसेस कमी झाल्या. शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त पर्यंत होत आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे”.
पुढे बोलताना ते म्हणाले, यावर्षी १.८२ कोटी नवे मतदार मतदान करणार आहेत. १८ ते २१ वयोगटात २१.५० कोटी मतदार तर, १०० वर्षांवरील मतदार दोन लाख असून ४८ हजार तृतियपंथी मतदार आहेत. मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, शौचालय, व्हीलचेअरची सोय असणार आहे. महिला मतदारांच प्रमाण पुरुष मतदारांहून अधिक आहे. ८५ वर्षावरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे. चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असलेल्यांना घरून मतदान करणे शक्य आहे. ‘फॉम डी’ भरून त्यांना घरून मतदान करता येईल. मतदारांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्र शोधणे सोपे होणार आहे. नो युवर केंडीडेट’ अपवरून उमेदवारांची माहित मिळणर आहे.
मसल, मनी, पॉवर आणि गुंडगिरी रोखण्यासाठी सीएपीएफचा वापर होणार असून निवडणूक प्रक्रियेत हिंसेला स्थान नसणार आहे. हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत. हिंसा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दया दाखवणार नाही. निवडणुकीदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमांवर लक्ष असणार आहे. गत सव्वावर्षात अकरा निवडणुका झाल्या. त्यात तीन हजार चारशे कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीत पैशांचा, बळाचा गैरवापर होऊ देणार नाही, असा इशारा आयोगाने उमेदवारांना दिला आहे.
फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. सोशल मिडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही. संशयित व्यवहारांची यादी बँका रोज पडताळणार आहेत. सोशल मिडिया पोस्ट काढून टाकण्यासाठी राज्यपातळीवर अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे. आरोपींचा, भाषेचा घसरता स्तर याची गंभीर दखल घेण्यात येईल. स्टार केम्पेनर्सला नियमावली देण्याचे राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे. ‘मीथ व्हर्सेस रीयालीटी’ पेज सुरु करणार आहे. प्रचार करताना मर्यादा ओलांडू नका. दिशाभूल जाहिराती रोखण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे २१०० निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रचारात मुलांचा वापर नको. कमीत कमी पुनर्निवडणुका व्हाव्या याचा प्रयत्न असणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.











