न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- गाडीची काच फोडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून टोळक्याने दहशत माजवत एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार आकुर्डी येथे घडला.
याप्रकरणी सुजित श्यामराव जाधव (रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अविनाश राजू शिंदे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली असून, बारक्याभाई, दुध्या, आदल्या, नन्या व अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल चौक रस्त्यावर पायी फिरत असताना आरोपीपैकी एकाने फिर्यादीच्या गाडीवर दगड मारून काच फोडली. याबाबत फिर्यादी विचारणा करण्यास गेले असता एकजण कोयता घेऊन फिर्यादीकडे धावून आला. फिर्यादीचा गळा आवळून म्हणाला मला बारक्याभाई म्हणतात, तुला आता खल्लास करतो, अशी धमकी दिली. जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला. फिर्यादीने हा वार चुकवून आरडाओरडा करीत घराच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी तीन ते चार जणांनी हातात काठ्या व कोयते घेऊन फिर्यादीचा पाठलाग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.