न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २२ मार्च २०२४) :- श्री क्षेत्र देहूगावमध्ये प्रशासन व श्री संत तुकाराम महाराज संस्थानने २७ मार्चला होणाऱ्या तुकाराम बीज सोहळ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांकडून मुख्य चौकात बेरीकेडस लावण्यात येत आहेत.
दरम्यान बुधवारी (दि. २०) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील १४ टाळकरी कमान ते श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरापर्यंतच्या दुकानांवर अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली.
बीज सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगावमध्ये भाविकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सोहळा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरात आणि पालखी मार्गावर अनेक दुकानदारांनी मर्यादा रेषेच्या पुढे येऊन अनधिकृतपणे दुकाने लावली आहेत. अशा दुकानदारांवर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
बीज सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर, पालखी मार्गातील अतिक्रमणे हटविणे, पथदिवे दुरुस्ती करणे, जलपर्णी काढणे, सफाई, अशी कामे सुरू आहेत. भैरवनाथ चौक बाह्यवळण मार्गावरील गायरानाजवळ असलेल्या पथदिव्यांची झालेली दुरवस्था व जळालेल्या वीज वाहिन्यांची पाहणी मुख्याधिकारी घार्गे यांनी केली. बीज सोहळ्ळ्यापूर्वी याची दुरुस्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
बीजोत्सवाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व शहर अभियंता संगप्पा गायकवाड यांनीही गावात सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना सोहळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.













