- इतिहास बदलण्याचे व व्देष पसरवण्याचे काम युती करत आहे – पार्थ पवार
- पांडुरंगाच्या साक्षीने ”चौकीदार चोर” म्हणणारेच आता ”चौकीदार थोर” म्हणू लागलेत – सचिन साठे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०१९) :- युती सरकारने मागील पाच वर्षात केंद्रातून राज्यासाठी एकही नवीन प्रकल्प आणला नाही. त्यामुळे या सरकारवर राज्यभर जनतेचा रोष आहे. बारामती पुणेसह मावळ, शिरूरच्याही जागा आघाडी जिंकेल. सत्ताबदल झाल्यानंतर सर्वात प्रथम मागील दोन वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पिंपळे निलख येथे आयोजित सभेत सांगितले.
मावळ लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. २४) रोजी पिंपळे निलख येथे आयोजित केलेल्या सभेत पाटील बोलत होते. या वेळी पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आमदार शरद रणपिसे, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री दिलीप सोपल, सेवादलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष गौतम आरकडे, एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, कॉंग्रेस अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, मावळ राष्ट्रवादी निरीक्षक घनशाम शेलार, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, हिरामण खवळे, दिलीप बालवडकर, भोसरी ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, बाबा बनसोडे, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, अनिल इंगवले, अशोक घोगरे, विशाल जाधव, वसिम ईनामदार, किशोर कळसकर आदी उपस्थित होते.
या वेळी अलका काळे, उज्वला महाले, छाया बागुल, निर्मला गुत्तेदार, उमा शेख, शिला विटकर, सविता धांडे, नसिमा मोमीन, गौसीया शेख, दिपाली लोंढे, यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आता हवा बदलली आहे, केंद्रात व राज्यात आघाडीच सत्तेवर येणार आहे. सर्वात सुशिक्षित व तरूण उमेदवार विरूद्ध निष्क्रिय कारकिर्द असणारे युतीचे उमेदवार अशी ही लढाई आहे. मागील पाच वर्षात यांनी एकही काम शहरासाठी केले नाही. अनधिकृत बांधकाम, चोवीस तास पाणीपुरवठा, रेड झोन, एचए कंपनी प्रश्न असा एकही प्रश्न त्यांना सोडविता आला नाही. एचए कंपनीच्या कर्मचा-यांनी तर या सरकारच्या विरोधात चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. शेतक-यांबरोबरच आता कामगारांवरही आत्महत्येची वेळ आली आहे.
सेनेवर टिका करताना पाटील म्हणाले की, सगळ्या प्राण्यांच्या उपमा संपल्या, निजामशाहीतील सगळे दाखले संपले. शिवसेनेबाबत जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता अशी यांची खालपासून वरपर्यंत निती आहे. पीसीएमसीत तर पैशासाठी हद्दीचे वाटप झाले आहे. त्यांना विकासाशी देणे-घेणे नाही, अशीही टिका पाटील यांनी केली.
महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार म्हणाले की, केंद्र व राज्यातील युतीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांच्या सर्वेक्षणातून आघाडी जास्त जागा मिळवेल, असे दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते विपर्यास करणारी वक्तव्ये करीत आहेत. इतिहास बदलण्याचे जाती धर्मात व्देष पसरवण्याचे काम युती करत आहे. देशावर ४० लाख कोटीचे व राज्यावर साडेतीन लाख कोटीचे कर्ज असतानाही त्यांच्याकडे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नियोजन नाही. आता मोदींनाच घरी पाठविणे आवश्यक आहे. त्यांची पवार साहेबांवर वैयक्तिक पातळीवरील टिका म्हणजे ‘मॅच्यूरिटी’ नसण्याचे लक्षण आहे. मोदींना सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारण्यास वेळ आहे, परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्माकर उभारण्यास वेळ नाही. नोटाबंदीमुळे १२ कोटी रोजगार गेले. देशाचा जीडीपी कमी झाला आहे. पराभव दृष्टीपथात आल्यामुळे पातळी सोडून ते प्रचार करीत आहेत. खासदारकीबरोबरच आमदारकी व मनपा देखील परत मिळवायची आहे, असे पार्थ पवार म्हणाले.
कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, एकाबाजूला जातीवादी शक्ती व हुकूमशाही आणि दुसरीकडे पुरोगामी विचारांची शक्ती व लोकशाही अशी ही निवडणुक आहे. भाजप सेनेची परंपरा खोटे बोलण्याची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी झाली आहे. हे सनातनी सरकार उलथून टाकण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे. पांडुरंगाच्या साक्षीने चौकीदार चोर हे म्हणणारेच आता चौकीदार थोर आहे म्हणू लागले आहेत. मागील साडेचार वर्षात या सोंगाड्या थापाड्यांनी राज्यभर तमाशा सादर केला. कॉंग्रेसने देशभर रचनात्मक काम केले आहे. जगात सर्वात जास्त अभियंते भारतात तयार होतात याचे श्रेय पंतप्रधान राजीव गांधी यांना जाते. १८ वर्षापुढील युवकांना मतदानाचा अधिकार राजीव गांधींनी मिळवून दिला. याची आठवणही साठे यांनी करून दिली.
यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार डॉ. विश्वजित कदम तसेच विजय अंभोरे, ईश्वर बाळबुद्धे, प्रताप गुरव, राहुल डंबाळे, कविचंद भाट, प्रशांत शितोळे आदींनी भाजप सेना युतीवर कडक टिका केली.
स्वागत सचिन साठे, सुत्रसंचालन मयूर जैसवाल तर आभार शहाबुद्दीन शेख यांनी मानले.















