न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०१९) :- महायुतीचे उमेदवार खा. श्रीरंग बारणे यांचा प्रचार दौरा व जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवार (दि.२५) रोजी शहरात आले आहेत. यावेळी माजी खा. गजानन बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर पक्षश्रेष्ठींवर केलेले आरोप माजी खासदार गजानन बाबर यांना चांगलेच महागात पडले होते. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर ते मनसेत दखल झाले. मात्र, तेथे ते अदखलपात्र ठरले. माझी चूक झाली असे सांगत, माफीनामा देऊन पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी बराच आटापिटा बाबर यांनी करूनसुद्धा पक्षश्रेष्ठीकडून हिरवा कंदील मिळालेला नव्हता.
चळवळीतील कार्यकर्ता म्हणून उदयास आलेला व संपूर्ण राजकीय आयुष्य शिवसेनेत व्यतित केलेल्या गजानन बाबर यांनी वयाची सत्तरी केव्हाच ओलांडली आहे. १९७४ पासून शिवसेनेचे काम करणाऱ्या बाबरांनी नगरसेवक, विरोधी पक्षनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, खासदार असा प्रवास शिवसेनेच्या माध्यमातूनच केला. बाबर म्हणजे शिवसेना, अशी त्यांची ओळख मानली जात होती. तथापि, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तयारी करायला सांगून ऐनवेळी पत्ता कापल्याने बाबर संतापले होते.
अखेर काही काळानंतर का होईना माजी खासदार गजानन बाबर यांना अखेरीस ग्रीन सिग्नल मिळालाच. त्यांनी पून्हा भगवा झेंडा हातात घेतला आहे.











