न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २६ एप्रिल २०१९) :- शिवसेनेचे उद्धव ठाकरे म्हणतात की, शरद पवारांनी निवडणुकीतून पळ काढला. मी १४ वेळा लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्त्या खेळणारा पैलवान तुम्हाला पाडेल. माझी तर गरजच भासणार नाही. बाळासाहेब ठाकरे माझे मित्र आहेत. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी काम केले. तुमचे योगदान काय? तुम्ही मला शिव्या घालण्याचे काम करतात. हे वागणे बरं नव्हे, या शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी टीका केली.
मंचर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रामनगरी येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.
या वेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, विवेक वळसे-पाटील, देवेंद्रशेठ शहा, दिलीप मोहिते, पोपटराव गावडे, राम कांडगे, उषा कानडे, बाळासाहेब बेंडे, मानसिंग पाचुंदकर, पूर्वा वळसे पाटील, पांडुरंग पवार, सदाशिव पवार, प्रकाश पवार, किरणताई वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सुषमा शिंदे, सचिन भोर, राजू इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होणार. त्यासाठी तुम्ही संसदेत डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारखा खासदार द्या. त्यांच्या पाठीशी मी आणि वळसे पाटील आहोत, अशी साद मतदारांना घालत पवार यांनी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
शरद पवार म्हणाले, ५ वर्षे सत्ता मोदींच्या हातात दिली. आश्वासने दिली. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते. सरकार कर्जमाफीबाबत बोलायला तयार नाही. अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष आहेत. शेतकर्यांचे कर्ज माफ करणार नाही. उद्योगपतींचे माफ करणार. बळीराजाला मदत नाही, असे हेकेखोरपणे ते सांगतात. अशा सरकारच्या प्रतिनिधींना धडा शिकविण्याची गरज आहे. डॉ. अमोल कोल्हेसारखा चांगला उमेदवार आहे. कष्टकर्यांनी त्यांच्या हातात मताचे माप देऊन संसदेत एक चांगला, उमदा तरुण पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. संभाजी ब्रिगडचे प्रवीण गायकवाड म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले, बारामतीमध्ये येऊन पवारांवर मंत्री चंद्रकांत पाटील टीका करतात. निवडणूक झाल्यावर रस्त्यावर फिरकू देणार नाही, मी संभाजी ब्रिगेडचा आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले, गेल्या ३ लोकसभा निवडणुकीत यश मिळवता आले नाही. या अपयशाची भरपाई करून देण्याची भूमिका मतदारांनी केली आहे. सद्यःपरिस्थितीमध्ये डॉ. अमोल कोल्हे विजयी होणारच. आता नवीन फंडा शिवसेनेने काढला आहे. डॉ. कोल्हे हे संसदेत गेले. मग एकदा विधानसभेला आढळराव उभे राहतील. त्यांचा त्रास साहेबांना म्हणजे वळसे पाटलांना होईल, असे वातावरण तयार केले जाते. शिवसेना कार्यकर्त्यांनी माझी चिंता करू नये. खासदार साहेब २०१६ साली एस.टी. आगाराचे काम सुरू केले. एस.टी. आगार बांधून दीड-दोन वर्षे झाली; परंतु तुम्हाला एस.टी. डेपो सुरू करता येत नाही तर रेल्वे कधी सुरू होणार?
उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, खेड येथील विमानतळ खासदारांमुळे गेले. सव्वालाख लोकांना रोजगार मिळणार होता, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम तुम्ही केले. या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,मंगलदास बांदल आणि जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांची भाषणे झाली.











