न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २६ एप्रिल २०१९) :- सर्जिकल स्ट्राइकवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत? असा सवाल करीत ज्यांना आपल्या देशाच्या सैनिकांवर विश्वास नाही ते जनतेकडे मतांची भीक मागत आहेत. काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असून, आम्ही ३७० कलम काढणार म्हणजे काढणारच. काँग्रेस जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढण्याची भाषा करीत असून, त्यांना लाज वाटत नाही काय? अशी शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (दि. २५) रोजी चाकण (ता. खेड) येथील जाहीर सभेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र, विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? हेच निश्चित नाही. आम्हाला मते द्या मग पुढे बघू असे सांगत आहेत. राहुल गांधी व शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून ते पंतप्रधानपदाची स्वप्न पाहत असून, तुम्हाला असले पंतप्रधानपदाचे उमेदवार चालतील काय? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. ज्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही त्यांनी देश चालविण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा सल्लाही दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपची पोलखोल करीत असल्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास शैलीत त्यांचा नामोल्लेख टाळून अशी गम्मत-जम्मत चालत असते, अशी खोचक शब्दांत टीका केली. बैलगाडा शर्यतींचा विषय सोडविण्यासाठी पुढील काळात स्वतः लक्ष घालून हा विषय सोडविला जाईल, असे आश्वासनही या वेळी ठाकरे यांनी दिले. खासदार तुमच्यासोबत राहणारा हवा की, नाटकात काम करणारा हवा, असा प्रश्न उपस्थित करून जसे आम्हाला मालिका बघून शिवराय आणि संभाजी महाराज समजले तसे त्या मालिकांमध्ये काम करणार्यांनी आपलेच काम वारंवार बघून निष्ठा कशाला म्हणतात ते शिकून घ्यावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवाजीराव आढळराव यांनी या भागात केलेल्या विकासकामावर जनतेचा विश्वास असल्याने ते चौकारच काय षटकार मारतील, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.
पालकमंत्री बापट यांनी आपल्या खास शैलीत पुणे जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असे या वेळी सांगितले. ते म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीमय वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यासाठी मतदार सज्ज आहेत. खा. शिवाजीराव आढळराव यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेची या भागात दिशाभूल करण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता सोबत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे या वेळी सांगितले.
या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, उमेदवार खा. शिवाजीराव आढळराव, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्हे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, शरद सोनवणे, सुलभा उबाळे, आशा बुचके, अशोक खांडेभराड, किरण मांजरे, शरद बुट्टे, अतुल देशमुख, राम गावडे, प्रकाश वाडेकर, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, राजेंद्र गोरे, संदीप सोमवंशी, संतोष डोळस आदींसह कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.











