न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०१९) :- शिवसेनेने आपली वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. राजकीय द्वेष भावनेतून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र, या सर्व चढाओढीत संबंधित तरुणींची नाहक बदनामी झाली. अक्षरशः ‘त्या’ तरुणींचे सार्वजनिक आयुष्य उद्धवस्त झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक शिवसेना आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. श्रीरंग बारणे यांना पराभव डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. महाराष्ट्राच्या अन्य मतदार संघातही राष्ट्रवादीचे पर्यायाने पवार कुटुंबियांचे पारडे जड होताना दिसत आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेना आणि उमेदवार बारणे यांनी पार्थ पवार यांच्या महाविद्यालय जीवनातील खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करीत असताना त्याला अनैतिक विचारांचा मुलामा देण्यात आला. या सर्व प्रकारामुळे पार्थ पवार यांची बदनामी तर झालीच, पण त्या फोटोतील तरुणींचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. पार्थसोबत कोण तरुणी आहेत, यावर जास्त चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संबंध महिला वर्गात शिवसेना आणि बारणे यांच्याविषयी असंतोष व्यक्त होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.











