न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नगर (दि. २६ एप्रिल २०१९) :- अनेक दुष्काळ पाहिले, छावण्याही पाहिल्या, यंदा मात्र आम्हाला चारा छावणी न वाटता आमच घरच वाटते. आम्ही आमच्या घरी जनावरांसाठी जो चारा देऊ शकत नव्हतो, तो आम्हाला छावणी चालकांकडून मिळत आहे. ऊस, वाढे व हिरवीगार मकाचा चारा मिळत असल्याने कोणतीही अडचण येत नाही. छावणीमुळे आमची जनावरे सुधारत आहेत. दुधाच्या प्रमाणातही तूट झालेली नाही. आमच्या जनावरांना चाऱ्याबरोबरच मुबलक व स्वच्छ पाणी मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे नगर तालुका खरेदी विक्री संघ संचलित चारा छावणी सुरू आहे. या छावणीमध्ये एकूण १०८९ जणावरे आहेत. यामध्ये लहान १७९ तर मोठे ९१० जणावरे आहेत. यामध्ये बैल, गायी व म्हशीचे प्रमाण अधिक आहेत. मोठ्या जणावरांना रोज १५ किलो ओला चारा तर लहान जनावरांना साडेसात किलो चाऱ्याचे वाटप दररोज केले जाते. ओल्या चाऱ्यामध्ये ऊस, वाढे व मका याची कुटी करून चाऱ्याचे वाटप दररोज केले जाते. १० मार्चपासून छावणी सुरू केलेली असून आजपर्यंत चाऱ्याची कोणतीही अडचण आलेली नसल्याचे शेतकऱ्यांनी न्यूज पीसीएमसीच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
मोठ्या जनावरांसाठी रोज अर्धाकिलो खुराकाचे वाटप दोन दिवसाआड केले जात आहे. तर लहान जनावरांसाठी २५० ग्रॅम खुराकाचे वाटप केले जात आहे. जनावरांसाठी हिरवा चारा श्रीगोंदा, शिरूर व नगरमधून उपलब्ध करून छावणीमध्ये आणला जातो. चारा छावणीसाठी प्रशासनाकडून आठ दिवसांतून एकदा चेकिंग केली जाते. नवीन जनावरे आली तरी, आम्ही परवानगीची वाट न पाहता त्यांना परत न पाठविता त्यांनाही चारा दिला जातो. छावणीत सी.सी.टी.व्ही बसविण्यात आले आहेत. अग्णीशमन यंत्रणेबरोबर रात्री प्रकाशासाठी एलइडी बसविले आहेत. जनावरांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. पाण्याची उत्तम व मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.















